तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींतील 6306 सदस्यपदांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 20 हजार 952 उमेदवारांनी 21 हजार 328 उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वच तालुक्यात अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असले तरी सोमवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.दाखल उमेदवारी अर्जांची छाननी उद्या (गुरुवारी) होणार आहे तर सोमवार, 4 जानेवारीच्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
दरम्यान, करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी, माढा तालुक्यातील निमगाव टे-बादलेवाडी, सापटणे (भोसे), महातपूर, जामगाव, वडाचीवाडी (उबू), मंगळवेढा तालुक्यातील मुढवी, अक्कलकोट तालुक्यातील नागनहळ्ळी, उडगी, हंजगी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबीचिंचोळी अशी 11 गावे बिनविरोधच्या मार्गावर असून याची अधिकृत घोषणा छाननी व अर्ज माघारीनंतरच होईल. याशिवाय बार्शी तालुक्यातील वैराग, माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथे एकही अर्ज दाखल झाला नाही. ही दोन्ही गावे नगरपंचायत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला.
तालुकानिहाय दाखल अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे. कंसात ग्रामपंचायतींची संख्या.
करमाळा (51) 1447, माढा (82) 2397, बार्शी (96) 2373, उत्तर सोलापूर (24) 752, मोहोळ (76) 2166, पंढरपूर (72) 3333, माळशिरस (49) 1891, सांगोला (61) 2600, मंगळवेढा (23) 910, दक्षिण सोलापूर (52) 1576, अक्कलकोट (72) 1883 एकूण (658) 21328.









