दैनंदिन कामकाजामुळे 106 जण लसीपासून वंचित
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण 11 कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांवर 1 हजार 100 व्यक्तींपैकी 994 जणांनी कोरोनावरील लस घेतली. लसीकरणानंतर कोणत्याही व्यक्तींमध्ये विपरित परिणामाची लक्षणे दिसून आली नाहीत. 106 कर्मचार्यांना आपल्या दैनंदिन कामकाजामुळे लस घेणे शक्य झाले नाही. लस घेतलेल्या व्यक्तींना 28 दिवसांनी लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी शितलकुमार जाधव यांनी दिली.
कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी आज शनिवारी सकाळी 10.30 वाजता सोलापूर शहरासह जिल्ह्यात 11 केंद्रांमध्ये लसीकरणास प्रारंभ झाला. शहरातील दाराशा हॉस्पिटलमधील केंद्राचे उद्घाटन नगरविकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांसमवेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लसीकरणापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल, अश्विनी ग्रामीण रुग्णालयाची पाहिणी केली. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, डॉ. राजेश चौगुले यांनी लसीकरणाच्या तयारीची माहिती दिली. तसेच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तर जिल्हाआरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांच्या उपस्थितीत कुंभारी येथील केंद्रात लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी 5 वाजपेर्यंत लसीकरण सुरू होते. यातील डॉ. वैशंपायन महाविद्यालय, बार्शी, सांगोला, करमाळा ही चार केंद्रे वगळता उर्वरित सात केंद्रांवर नियोजनाप्रमाणे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले. पहिल्या दिवशी 994 व्यक्तींचे लसीकरण झाले. मात्र कोणालाही विपरित लक्षणे आढळली नाहीत. अश्विनी ग्रामीण रुग्णालय केंद्रावर एका महिलेला थोडीशी चक्कर आल्याचे जाणवले. अवघ्या पाच मनिटांत कमी झाल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी जाधव यांनी सांगितले. लसीकरण यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने संयुक्तरित्या नियोजन करण्यात आले होते.
अशी होती केंद्रावरची तयारी –
- लसीकरण केंद्रे रांगोळी व फुलांनी, भिंत्तीपत्रकांनी सजविण्यात आली होती.
- येणार्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासणे. ओळखपत्राची खातरजमा करून आत सोडण्यात येत होते.
- प्रत्येक व्यक्तींचे लसीकरणासाठी संमती अर्ज भरून घेण्यात येत होते. टोकन पध्दतीचा अवलंब करण्यात आला होता.
- नोंदणी कक्ष, लस टोचणी कक्ष आणि निरीक्षक कक्षात सहा डॉक्टर व कर्मचार्यांचे पथक होते. तसेच अतिदक्षता विभागात पाच खाटांची तयारी ठेवण्यात आली होती.
- लसीकरणाप्रसंगी प्रत्येक वेळांची नोंद घेण्यात आली. लसीकरणानंतर अर्धा तासापेक्षा अधिक वेळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
- लसीकरणानंतर संपूर्ण माहिती वेबसाईटवर लोड करण्यात येत होती.
केंद्रनिहाय लसीकरण –
- दाराशा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – 100
- डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – 60
- सिव्हिल हॉस्पिटल – 100
- अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय – 100
- बार्शी ग्रामीण रुग्णालय – 71
- करमाळा उपजिल्हा रुग्णालय – 73
- अकलूज उपजिल्हा रुग्णालय – 100
- मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय – 100
- पंढरपूर ग्रामीण रुग्णालय – 100
- सांगोला ग्रामीण रुग्णालय – 90
- कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालय – 100








