तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
सोयाबीन रास करताना मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. भास्कर रामचंद्र पवार (वय-60) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्देवी घटना अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे घडली. पवार यांच्या शेतात आज दुपारी दीड वाजता सोयाबीन रास सुरु होता. स्वत:च्या शेतात आणि स्वत:च्या मालकीच्या मशिनवर सोयाबीन रास करत असताना भास्कर पवार यांचा मशिनमध्ये हात सापडून खांद्यापासून वरचा डोक्याचा भाग पूरती चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला आहे. यादुर्दैवी घटनेमुळे पवार कुटूंबीयावर व संपूर्ण हंजगी गावावर शोककळा पसरली आहे. तर, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भास्कर पवार हे गेल्या दोन वर्षापूर्वी वळसंग येथील जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेतून बॅक इन्स्पेक्टर या पदावरून निवृत्त झाले होते. सोलापूर येथे जुळे सोलापूर या भागात ते राहत होते. काल पासुन पाऊस थांबल्याने सोयाबीन रास करण्यासाठी आज सकाळीच सोलापूर वरुन येऊन सोयाबीन रास करण्यासाठी मशिनवर उभे होते. हाताला सोयाबीन देठ टोचू नये म्हणून दोन्ही हाताला कापड गुंडाळले होते. मशिनवर हाताने सोयाबीन दाबत असताना हाताचे कापड मशिनने ओढून घेतल्याने खांद्या पासुन वरचा शरिराचा भाग चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. पवार यांच्या पाठीशी पत्नी दोन मुली एक मुलगा सुना, भाऊ, आई असे एकत्रित परिवार आहे.