सोलापूर : प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन एकीकडे वृक्षलागवड मोहीम हाती घेत असताना दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील भर दिवसा बोर, लिंब, उंबर, कवठ व इतर झाडांची विनापरवाना कत्तल केली जात आहे. याप्रकरणी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भगवान भुसारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत रेळेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे मनपा उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे यांनी सोमवारी सांगितले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या परिसरातील बोर, लिंब, उंबर, कवठ व इतर झाडांची सोमवारी कत्तल केली जात होती. यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगीसाठी अर्ज करणे, त्यानंतर याबाबत महापालिका प्रशासनाकडून सर्वे व सर्व्हेअंती येथील झाडे धोकादायक असतील, अडथळा ठरत असतील तर ती तोडण्यास परवानगी मिळाली असती. परंतू महापालिकेच्या उद्यान विभागाकडे येथील झाडे तोडण्या संदर्भात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भगवान भुसारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत रेळेकर यांनी कोणताही अर्ज न करता थेट वृक्षतोड केली. सदरची बाब मनपा उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे यांना समजताच त्यांनी तेथील वृक्षतोड प्रकाराचा पंचनामा करण्यासाठी शंकर रोहिते यांना पाठवले.
रोहिते यांनी वृक्षतोड झाल्याबाबत पंचनामा करुन सदरचा अहवाल उद्यान अधिक्षक कांबळे यांच्याकडे सादर केला. ज्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भगवान भुसारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत रेळेकर यांनी हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. त्यामूळे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भुसारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेळेकर यांना कारणे दाखवा नोटीस काढली असल्याचे उद्यान अधिक्षक कांबळे यांनी सांगितले. यांच्याकडून येत्या 3 दिवसात उत्तर येणे अपेक्षीत आहे. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन गुन्हा दाखल करणार असल्याचे उद्यान अधिक्षक कांबळे यांनी सांगितले.
भुसारे व रेळेकरांची टोलवाटोलवी
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग परिसरातील झाडे तोडण्यासाठी याच विभागातील विजेचा वापर करुन इलेक्ट्रिक कटरने वृक्षतोड सुरु होती. याबाबत येथील कामगारांना विचारले असता त्यांनी भुसारे व रेळेकर यांची नावे सांगत येथून पलायन केले. याबाबत भुसारे यांना विचारले असता त्यांनी याबाबत कागदपत्रे बघतो असे सांगितले. तर रेळेकर यांनी वैदकीय अधिक्षक डॉ. मस्के यांची परवानगी घेतली आहे, असे सांगितले.