करमाळा / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
पत्रकारांनी जास्तीत जास्त सकारात्मक बातम्या देऊन सामाजिक स्वास्थ्य बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे उपस्थित होते.
पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी कमला देवीची प्रतिमा हार शाल फेटा तेजस्वी सातपुते यांना देऊन स्वागत केले.
यावेळी नासीर कबीर ,प्रा. अशोकराव नरसाळे ,जयंत दळवी, सचिन जव्हेरी, संजय मस्कर,नागेश चेंङगे, सागर गायकवाड, निलेश चव्हाण ,अलीम शेख, दिनेश मडके, शेखर स्वामी, अतुल बोकन, शंभूराजे फरतडे प्रमोद झाडबुके सह अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना तेजस्वी सातपुते म्हणाल्या की तालुका पत्रकार संघाचा स्वतंत्र कार्यालय असलेल्या संघटनेचे काम कौतुकास्पद आहे .
ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करून काम करणारे पत्रकार यांचे काम कौतुकास्पद आहे. समाजात सध्या नकारात्मक घटना वाढत आहेत. मात्र नकारात्मक घटना असून सुद्धा त्यातील सकारात्मक बाजू समाजापुढे मांडण्याचे काम पत्रकार करू शकतो आणि जेवढी सकारात्मक पत्रकारिता होईल तेवढे सामाजिक स्वास्थ्य मजबूत होईल पत्रकार हा समाजातील विश्वासाला पात्र ठरलेला घटक असून अजूनही बातमीवर वाचक व जनता शंभर टक्के विश्वास ठेवते इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढत असला तरी प्रिंट मीडियाचे महत्त्व कधीच कमी होणार नाही करमाळ्यातील पत्रकारांनी मला सातत्याने संपर्क ठेवून या भागातील अडचणी मांडल्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले आहे.
यावेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे म्हणाले की पत्रकार व पोलीस एका नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही बाजूने जर समाजाच्या हिताचे काम झाले तर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहू शकते पोलिसांच्या चांगल्या कामाला पत्रकारांच्या कायमचे सहकार्य असते पण समाजाचे प्रश्न मांडताना त्यांच्या भावना मांडताना वस्तुस्थिती मांडताना काहीवेळा आमच्याकडून अधिकारीवर्ग दुखावला जातो तरीसुद्धा सकारात्मक परस्थिती निर्माण होऊन शांतता अबाधित राहील अशाच बातम्यांना आम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे काम करतो प्रा. अशोकराव नरसाळे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.









