तरूण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील साडे येथील खून प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश लोंढे याला येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासणी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रवीण साने यांनी लोंढे यास करमाळा न्यायालयातील न्यायाधीश प्रशांत घोडके यांच्या समोर काल (ता.12) हजर करून ७ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागण्यात केली होती. यात आरोपीतर्फे ॲड. नवनाथ राखुंडे यांनी युक्तिवाद केल्यानंतर आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
यात हकीकत अशी की, 10 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास प्रकाश हणुमंत लोंढे यांचे घरासमोर विष्णु नारायण बनसोडे हे आले होते. त्यावेळी प्रकाश हणुमंत लोंढे याने विष्णु बनसोडे याला तु इकडुन का आला? तुला किती वेळा सांगितले आहे. शाळेकडुन जायचे. या रस्त्याने यायचे नाही असे म्हणुन, शिवीगाळ सुरू केली व त्यानंतर हाताने तोडांवर बुक्कीने मारून, कमरेत लाथ घातली. त्यानंतर बनसोडे खाली पडला. नंतर प्रकाश लोंढे याने विष्णु बनसोडे याचे डोके हातात पकडुन सिमेंटच्या रोडवर अपटले. तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर बनसोडे यास करमाळा येथे उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर अक्षय गायकवाड यांनी फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळाला भेट दिली व संशयितास तात्काळ अटक केली. पोलीस उपनिरिक्षक साने यांचेकडे तपास दिला. यात आरोपीतर्फे ॲड. नवनाथ राखुंडे यांनी काम पाहिले आहे. साने या घटणेचा कसून तपास करत असून या घटनेमागे फिर्यादीत दिलेलेच कारण आहे की दुसरे काही नेमके वास्तव येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल असे मत साने यांनी व्यक्त केले.









