सस्ती दारू, मेहंगा तेल…. इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर युवक राष्ट्रवादीचे “दुचाकी ढकलो” आंदोलन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विजापूर वेस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत “गाडी ढकलो” आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका, उठा उठा महागाई आली, मोदी सरकार जाण्याची वेळ आली, बेचारी जनता करे पुकार, लूट राही है मोदी सरकार, आम आदमी और किसान, झेल रहा पेट्रोल-डिझेल कि मार, वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा पेट्रोल आदी गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आज सोमवारी सकाळी ११ वाजता विजापूर वेस येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली संख्येने कार्यकर्ते जमले. तेथून सर्व कार्यकर्ते आपली दुचाकी वाहने ढकलत आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत बेगम पेठ पोलीस चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. तेथे आल्यानंतर मोदी सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच आता इंधन दरवाढीचा दुहेरी सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाढत्या महागाईचा भार मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेवर पडत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उत्पन्न कमी आहे. बँकांमध्ये कर्जाचा बोजा वाढलेला असल्याने व नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असतानाच आता इंधन दरवाढीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर “गाडी ढकलो”आंदोलन करून मोदी सरकारचे लक्षवेधण्यात आले.
मोदी सरकारकडून जनतेची खुलेआम लूट
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनासारख्या बिकट परिस्थितीला देशभरातील जनता तोंड देत असताना नरेंद्र मोदी सरकारने मात्र सातत्याने इंधनाच्या दरात वाढ करून देशभरातील जनतेची खुलेआम लूट सुरु केली आहे. इंधनाच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. इंधन दरवाढीचा फटका थेट महागाई वाढीवर झाला आहे. त्यामुळे देशभरातील जनता इंधन दरवाढीमध्ये होरपळून निघत असताना मोदी सरकार मात्र दर नियंत्रणात आणण्यासाठी कसलेच प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. इंधन दरवाढीचा बोजा डोक्यावर घेऊन आज आम जनता संसाराचा गाडा कसाबसा हाकत आहे. मोदी सरकार हे आम जनतेचे नसून उद्योगपतींना मोठे करणारे आहे. या इंधन दरवाढीचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. आज लोकांना वाहनावर नाही तर बैलगाडी आणि सायकलींवर प्रवास करण्याची वेळ मोदी सरकारने आणली आहे.
-जुबेर बागवान, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोलापूर









