दुकाने चारपर्यंत राहणार सुरू ः 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहणार
प्रतिनिधी / सोलापूर
राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी जाहीर केली आहे. ती सोमवार 7 जूनपासून लागू होणार असून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
दरम्यान, सोलापूर शहराला सोमवारपासून आणखी दिलासा मिळणार असून दुपारी चारपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत तर शहरातील 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहणार आहेत. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व इतर दुकाने बंद राहणार आहेत. सोलापूर शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2.50 टक्के तर बेड 40 टक्के भरले आहेत. ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 6.78 टक्के आहे तर 30 टक्के बेड भरलेले आहेत. आता शहर स्वतंत्र युनिट असल्याने पालिका आयुक्तांना निर्णय घेता येणार आहे. नियमानुसार सोलापूर शहर पहिला किंवा दुसरा स्तरांमध्ये येऊ शकते. ग्रामीण भाग तिसऱया स्तरांमध्ये येईल. मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.