तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाले पण हे लॉकडाउन काही अंशी शिथिल करुन ग्रामीण भागात काही विशिष्ट अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशामध्ये नगरपालिका क्षेत्रातील मार्केट कॉम्प्लेक्स आणि मार्केट बंद राहतील या मार्केट मधील अत्यावश्यक वस्तुंची दुकाने दुकाने सुरू राहतील असे स्पष्ट म्हटले असल्याने इतर व्यावसायिकांमध्ये स्पष्ट व अधिकृत माहिती मिळाली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी प्रशासनाने नागरिकांपर्यंत योग्य ती माहिती देण्याची गरज आहे.
शासनाने लॉकडाऊनचा तिसऱ्या टप्प्यात अनेक व्यवसाय सुरू करण्याचे परवानगी दिली आहे. मात्र शहरातील मार्केटमधिल अत्यावश्यक दुकाने वगळता कोण कोणती दुकाने चालू ठवायची व कोणती बंद ठवायची याची अधिकृत माहिती मिळाली नसल्यामुळे व्यवसाय चालक व कर्मचारी आपल्या दुकानासमोर येऊन आदेशाची वाट पहात बसल्याचे चित्र आज दिसत होते. कायद्याचा बडगा उगारुन पुन्हा दंड आकारला जाऊ नये ही भीती व्यवसायीकांमध्ये दिसत होती.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशात पान नंबर 3 मधील चौथ्या क्रमांकावर B मधील d मध्ये 2 क्रमांकावर नागरी क्षेत्रातील (नगरपालिका क्षेत्रातील) सर्व मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मार्केट बंद राहतील तथापि त्या मार्केट कॉम्प्लेक्स व मार्केटमधील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी आहे असे असे नमूद करण्यात आल्यामुळे सर्व इतर व्यवसायिक संभ्रमावस्थेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचने बाबत वरिष्ठांकडून सविस्तर माहिती घेऊन इतर व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात येतील. तोपर्यंत नेहमीप्रमाणे दिनक्रम सुरू राहील. सूचना आल्यानंतरच इतर व्यावसाय सुरू करावेत. – कैलास गावडे, मुख्याधिकारी. न.पा. कुर्डुवाडी









