प्रतिनिधी / वैराग
बार्शी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तेथेच जवळपासच उपचार मिळण्याकरिता तालुक्यातील वैराग येथील नऊ डॉक्टरांनी एकत्रित येऊन संतनाथ कोविड सेंटर सुरू केले आहे. वैराग परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सोयीसाठी नकाते मंगल कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला आज आ. राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट दिली. या ठिकाणी 20 ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली, असून एकूण 50 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कोवीड केअर सेंटरमध्ये दोन रक्त तपासणी प्रयोगशाळा, एक्स-रे टेक्निशियन, मेडिकल स्टोअरची सोय करण्यात आली आहे.
त्याठिकाणी असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करून, अडी-अडचणींची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करून त्या सोडविण्याचे अभिवचन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले. तसेच काही बाबींबाबत त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की वैराग मध्ये पाच दिवसाचा जनता कर्फ्यू ही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, प्रांत अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, जि.प.सदस्य मदन दराडे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, वैराग ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.जयवंत गुंड, वैरागचे पोलिस निरीक्षक विनय बहीर, ग्रामसेवक सचिन शिंदे, माजी सरंपच संतोष निंबाळकर ,डॉ.सुहास मोटे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. संताजी देशमुख डॉ. आनंद गोवर्धन, डॉ. सचिन पाटील, डॉ. पवन गुंड, डॉ. रियाज तांबोळी, डॉ. श्रेयस शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य वैजिनाथ आदमाने ,नानासाहेब धायगुडे उपस्थित होते.