तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
येत्या अडीच महिन्यात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पसरतील. त्यामुळे ८० टक्के जिल्हा कोरोनाबाधित असेल, असे धक्कादायक भाकीत वैद्यकीय अधिष्ठाता (डीन) डॉ. संजीव ठाकूर यांनी बुधवारी दुपारी केले. त्यांचे हे वक्तव्य समाजमाध्यमात चित्रफितीद्वारे प्रसृत झाल्याने शहरात घबराट पसरली. त्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी थेट संपर्क केला असता आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लॉकडाऊन उठवल्यानंतर रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी जी प्रचंड गर्दी होत आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. ही गर्दी अशीच होत राहिली तर येत्या अ़डीच महिन्यात सोलापूर जिल्हा ऐंशी टक्के कोरोनाबाधित होईल, असे आपले म्हणणे होते. लोकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ती घेतली नाही तर कोरोनाचा प्रसार अटळ आहे, असे आपल्याला म्हणायचे होते.
दरम्यान, आपला खुलासाही त्यांनी माध्यमांकडे पाठवून दिला आहे. जबाबदार पदावरील अधिकाऱ्याने असे वक्तव्य केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना समज द्यायला हवी, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.








