प्रतिनिधी / सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभाची तयारी सुरू झाली असून यामध्ये पदवी-पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.
कुलपती कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी ते मार्च 2021 या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे. या समारंभात पदवी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला नऊ जानेवारीपासून प्रारंभ झाले आहे.
2015 ते 2020 यादरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहे. 2005 ते 2014 दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. 2 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाचा ऑनलाईन भरलेल्या अर्जाची साक्षांकित प्रत 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत विद्यापीठात जमा करावे लागणार आहे.
su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर student login करून convocation या लिंकवर पदवी प्रमाणपत्रसाठी अर्ज उपलब्ध आहे. दीक्षांत समारंभाची तारीख व वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ईमेलद्वारे आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना आधार क्रमांकावरून पदवीप्रमाणपत्राची ई प्रत संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. फॉर्म भरताना काही अडचण आल्यास convocation@sus.ac.in या इमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.