१ लाख ३५ हजारचे डिझेल चोरट्याने केले लंपास
प्रतिनिधी / अक्कलकोट
अकक्कलकोट तालुक्यातील वागदरी जवळ असलेल्या शाब्दी पेट्रोल पंप येथे दि २४ रोजी मध्यरात्री १२-३० वाजता अंडरग्राउंड डिझेल टाकीतून १५०० लिटर डिझेलची चोरी केली असून १ लाख ३५ हजार १७० रुपयेचे डिझेल पाईपच्या साहाय्याने काढून अज्ञात चोरट्यानी अतिशय शिताफीने लंपास केले आहे.
याबाबत माहिती अशी की, दि २३ रोजी सायंकाळी ४ वाजता डिझेल व पेट्रोलने भरलेला टँकर मागवून त्यातील ३००० लिटर पेट्रोल व ९००० हजार लिटर डिझेल पंपावर रिकामा करून घेतला होता. नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता पेट्रोल पंप बंद करून शरणबसप्पा खांडेकर व महादेव खांडेकर हे दोघे मॅनेजर पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये झोपले होते व आझरोदिन मुल्ला व महेश शिरागापुरे हे कर्मचारी ऑफिसच्या बाहेर झोपी गेले होते.
पंपावरील बाजूचे लाईट बंद करून मध्यभागीची सेंटरची पोल लाईट चालू ठेवली होती. दि २४ रोजी सकाळी शरणबसप्पा खांडेकर व महादेव खांडेकर हे दोघे मॅनेजर सकाळी ६ वाजता उठले. त्यानंतर पंप चालू करण्यासाठी ऑफीस मधील स्टॉक मीटर जवळ जाऊन रीडिंग पाहून डी एस आर रजिस्टरला मीटर रेडींग लिहून घेतले त्यावेळी ऑटोमेशन मशीन मध्ये अंडरग्राउंड डिझेल टाकीतील डिझेल कमी झाल्याचे दिसले.त्यानंतर खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने पेट्रोल पंप मधील अंडरग्राउंड डिझेल टाकीत पाईप टाकून डिझेल कशाच्या तरी साह्याने ओढून घेऊन चोरी केली आहे.
ही चोरी मध्यरात्री १२- ३० ते २- ३० असे जवळपास दोन तास चालू होती. त्यामध्ये १,३०,१७० रुपये किंमतीचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीचे एकूण १५०० लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने अतिशय शिताफीने चोरी केली आहे. पंपावर असणाऱ्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये एका इसमाचे अंधुक चित्र दिसत आहे. याबाबत पंपाचे मॅनेजर शरणबसप्पा खांडेकर यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, विलास नाळे, पोलीस हवालदार विपीन सुरवसे, पो हे.अंगद गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे हे करीत आहेत.









