तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
बाळे येथील युवा चित्रकार प्रतीक तांदळे अर्ध्या एकर शेतीमध्ये चित्रकलेच्या माध्यमातून सुंदर पर्यावरण पूरक हरित अशी श्री गणेशाची प्रतिमा साकारत आहे. ही प्रतिमा शंभर बाय दोनशे फूट असल्याचे चित्रकार प्रतीक तांदळे यांनी सांगितले.
मागील 3 दिवसापासून या प्रतिमेच्या मार्किंगचे काम चालू असून यामध्ये अळीव रोपच्या साहयाने मार्किंगमध्ये पेरणी करणार आहे. हे अळीव गवत पूर्ण उगविण्यासाठी साधारण 10 दिवस लागणार आहेत. बाप्पाच्या आगमनापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
प्रतीक तांदळे यांनी मागील काही दिवसांपूर्वी चीनच्या हल्ल्यात शहीद कर्नल संतोषबाबू यांना चित्र कलेतून श्रद्धांजली वाहिली होती. दरम्यान, गणरायाची प्रतिकृतीचे काम पूर्ण करण्यासाठी अभिजित गायकवाड, राघव शिंदे, बॉबी तोडकारी, वैभव कोळी, अजय बामनकर बालाजी अंबुरे, ओंकार राजुरे आदी परिश्रम घेत आहेत.