प्रतिनिधी/कुर्डुवाडी
महादेववाडी ते गवळेवाडी रस्त्यावर मालवाहू टिपर मागे घेताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस टिपरची जोराची धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी ठार झाला. ही घटना आज, बुधवार (दि.१०) दुपारच्या सुमारास गवळेवाडी ता.माढा येथे घडली.
याबाबत गवळेवाडीचे पोलिस पाटील रवीकांत गौतम गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टिपरचालकाच्या विरोधात कुर्डुवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव रामचंद्र माळी वय ६० रा.उबरे (पागे) ता.पंढरपुर असे मयताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिपरचालक हा टिपर (एम एच ४५ ए एफ ४४९९) हयगयीने व निष्काळजीपणे वळणावर मागे घेत होता. त्याचवेळी टिपरच्या पाठीमागे असणाऱ्या मोटारसायकल (एम एच ४५ व्ही ६४१)यास जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मयत झाला.









