तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज नव्याने एकूण १५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ३६२ झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
कुर्डुवाडी शहरात आज सकाळी ३ जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला. त्यानंतर आज घेण्यात आलेल्या अँन्टीजेन टेस्ट मधून आणखी ४ जण बाधित असल्याचे समोर आले.
आज जैनमंदिर परिसरातील १ व्यक्ती, पोस्ट रोड परिसरातील १ व्यक्ती नव्याने बाधित असल्याचे समोर आले. तर माढा रोड परिसरातील पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील २ व्यक्ती, बाधित परिचारीकेच्या संपर्कातील परंडा रोड परिसरातील १ महिला , तसेच शिवप्रतिष्ठान नगर येथे नव्याने २ महिला बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून कुर्डुवाडी शहरात आज एकूण ७ जण कोरोना बाधित असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष अडागळे यांनी सांगितले.
तसेच तालुक्यात इतर ठिकाणी उपळाई बु, दारफळ ,मानेगाव, माढा , खैराव, मोडनिंब, कुर्डू येथे पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील तर काही नव्या लोकांची रॅपीड टेस्ट घेतली असता उपळाई बु येथे १, दारफळ १, मानेगाव १, माढा येथे १ , खैराव येथे १,मोडनिंब १ तर कुर्डू येथे २ असे कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे.









