प्रतिनिधी / बार्शी
बार्शी नगर परिषदेतील सफाई कामगार अशोक बबन आलाट यांचा सफाई काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळेस त्यांना बार्शीतील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले तेथे त्यांचा मृत्यू झाला. आलाट यांचा मृत्यू नगरपरिषदेने कामगारांच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली नसल्याने झाला असा आरोप करत बार्शी नगरपालिकेचे सर्व सफाई कामगारांनी बार्शी नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी कामगारांच्या वतीने नगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनावरती गंभीर आरोप करण्यात आले. बार्शी नगर परिषद कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही साधने देत नाहीत , तसेच त्यांच्या आरोग्यविषयक कोणती ही काळजी घेतली जात नाही. एखाद्या कर्मचारी आजारी पडला तर त्यास कोणत्याही प्रकारे आर्थिक मदत नगरपालिकेकडून केली जात नाही. तसेच सर्व कामगारांचे विमा काढण्याची ही मागणी आज या आंदोलनामध्ये करण्यात आले याचबरोबर मयत सफाई कामगार यांच्या कुटुंबासाठी तात्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली.
आंदोलकांची भेट घेण्यासाठी बार्शी नगर परिषदेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी या कामगारांशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. यावेळी असिफ तांबोळी यांनी सांगितले की, मयत कर्मचारी अशोक आलाट यांच्या कुटुंबातील एकाला बार्शी नगर परिषदेमध्ये 15 दिवसाच्या आत नोकरी दिली जाईल, तसेच सर्व नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरवला जाणार असून एक लाखापर्यंत मोफत उपचार होतील.
यावेळी बार्शी नगर परिषद विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे हे ही आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनावेळी अजित कांबळे, ऍड. अविनाश गायकवाड, नितीन शेंडगे, जयपाल वाघमारे, आनंद कांबळे, मुकुंद पवार, नेमिनाथ पवार, रामेश्वर मुळे, एकनाथ जाधव आदींनी आक्रमक भुमिका घेतली होती. कामागारांच्या या आंदोलनास युवक काँग्रेस बार्शी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन समाज पार्टी, दलित महासंघ आदींनी पाठिंबा दिला.









