सर्वच अहवाल निगेटिव्ह
प्रतिनिधी/बार्शी
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बार्शी नगरपालिकेने येथील रेड लाईट एरियातील ५६ महिलांची मोफत कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात एकही महिला कोरोना बाधित आढळून आली नाही. बार्शी नगरपालिकेने राबविलेला हा जिल्ह्यातील पहिला उपक्रम ठरला आहे.
बार्शी नगरपालिकेच्यावतीने छोट्या मोठ्या व्यापार्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी बार्शीतही ही प्रक्रिया सुरु केली. तथापी, रेड लाईट एरियातील महिलांचीही कोरोना चाचणी करावी असे सागर माने यांनी सूचविले होते. यानंतर मुख्याधिकारी पाटील, नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी यांनीही या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.शितल बोपलकर यांच्या सहकार्याने व डॉ. अशोक ढगे, अतुल भागवत, डॉ. निलीमा कुलकर्णी, डॉ. पवन गुंड यांच्या योगदानानुसार या महिलांची शुक्रवारी सकाळी रॅपिट टेस्ट घेण्यात आली. यामध्ये एकही महिला कोरोना बाधित आढळली नाही. जिल्हाच नव्हे तर राज्यातील नगरपालिकास्तरावरील रेड लाईट महिलांची मोफत कोरोना तपासणीचा बार्शी नगरपालिकेचा हा पहिला उपक्रम ठरला आहे. रेड लाईट महिला संघटनेच्या बायडाबाई देशमुख, लक्ष्मीबाई जाधव तसेच किरण परांजपे आदींनी यासाठी सहकार्य केले.
यासाठी उपमुख्याधिकारी जयसिंग खुळे, मिळकत विभागाचे महादेव बोकेफोडे यांनी महिलांनासाठी वाहनाची व्यवस्थाही केली होती. या उपक्रमानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रशासनाचे कौतुक केले. तत्पूर्वी आमदार राऊत मित्र मंडळाने या महिलांना कोरोना काळात धान्य वाटपही केले होते.
वायकुळे यांचा पुढाकार
या चाचण्या करण्यासाठी रेड लाईट एरियातील महिला सुरुवातीस चाचण्या साठी तयार होत नव्हत्या मात्र या महिलांसाठी काम करणारे आणि त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून समस्या सोडविणारे बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन वायकुळे या महिलांची बैठक घेऊन त्यांना धैर्य देत त्यांची चाचणी साठी मानसिक तयारी केली.









