तरूण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी शहरातील मध्यवर्ती आणि मोठी असलेली महात्मा फुले भाजी मंडई तात्काळ चालू करा तसेच भाजीमंडई याठिकाणी सर्व सुविधा तात्काळ द्याव्या अशा मागणीचे निवेदन आज महात्मा फुले समता परिषद व सावता परिषद बार्शी शाखेच्या वतीने बार्शी नगरपरिषदेस देण्यात आले यावेळी समता व सावता परिषदेच्या पदाधिकारी, महात्मा फुले भाजी मंडईतील भाजी विक्रेते व व्यापारी उपस्थित होते.
महात्मा फुले भाजी मंडई बाबत मागणीचे निवेदन देताना बार्शी शहराध्यक्ष समता परिषदेचे बार्शी शहराध्यक्ष नितीन भोसले यांनी सांगितले की , कोरोणा विषाणू संसर्गामुळे गेली अकरा महिने भाजी मंडई बंद होती आता भाजी मंडई मूळ जागी न भरता शेजारील असणाऱ्या भोगेश्वर मंदिराच्या रस्त्यावरती भरत आहे. त्याच ठिकाणी मोठी गटारे आणि लेंडी नाला असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा फुले भाजी मंडई मध्यवर्ती असल्याने सर्व शहर आणि विस्तारित भागातून भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची या मंडईत झुंबड लागलेली असते.
सध्या या मंडईमुळे या परिसरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिक अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महात्मा फुले भाजी मंडई मूळच्या जागी पूर्ववत करून सुरळीत चालू करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या.
या निवेदनात सध्या भाजी मंडईला असणारे प्रवेशद्वार या ठिकाणी गेट लावावे, मंडईच्या तिन्ही बाजूने असणारी भिंत व त्यावरीलची जाळी उध्वस्त असून ती तात्काळ दुरुस्त करावी, भाजी मंडईला कायमस्वरूपी सुरक्षारक्षक पुरवण्यात यावा मंडईतील मोकाट जनावरांचा त्रास तात्काळ थांबवावा, भाजी मंडई येथील पाणी निचरा होण्यासाठी असणाऱ्या गटारी दुरुस्त करून त्या जिवंत कराव्यात मंडईमधील पत्राशेड येथील सर्व पन्हाळी दुरुस्त कराव्यात, भाजी मंडई या ठिकाणी पुरेशी लाइटची व्यवस्था करावी, त्याचबरोबर महात्मा फुले भाजी मंडईची पूर्वी बांधलेली स्वागत कमान पडली आहे ती कमान पूर्ववत बांधून मिळावी, भाजी मंडई याठिकाणी शौचालय व मुतारी ची व्यवस्था आहे परंतु ती सध्या कार्यान्वित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ शौचालय व मुतारी दुरुस्ती व स्वच्छता करून कार्यान्वित करावी, भाजीपाला धुण्यासाठी असणारे हौद हे दुरुस्त करून त्याच्यामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज बार्शी नगरपरिषदेस देण्यात आले.
पालिकेच्यावतीने प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे यांनी हे मागणीचे निवेदन स्विकारले. यावेळी समता परिषद बार्शी तालुका अध्यक्ष दीपक ढगे, शहराध्यक्ष नितीन भोसले, सावता परिषदेचे तालुका अध्यक्ष दिनेश नाळे, कृष्णा यादव, साजिद बागवान, पप्पू ढगे, कृष्णा जगताप, शुभम हांडे, भीमा खुणे आदी उपस्थित होते.