वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसाचें राहणार लक्ष
नवरात्र उत्सव, दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्याचे केले आवाहन
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट
वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर पोलीसाचें लक्ष राहणार आहे. पूर्वी गुन्हे केलेल्यांनी ठरवावे की आपण चांगल्या मार्गाला लागावे की कायदेशीर कारवाईला सामोरे जायचे. चांगल्या लोकांना त्रास देणाऱ्याचीं गय करणार नाही. चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि गुन्हेगारांवर कारवाई हे पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे असे मत सोलापूर जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी अक्कलकोट शहर-तालुक्याचा दौरा केला. उत्तर आणि दक्षिण पोलीस ठाण्यास भेट देऊन कामकाजा आढावा घेतला. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, कोरोनासोबत सर्वाना लढायचे आहे. शासनाने दिलेले नियम पाळावेच लागतील. अक्कलकोटमध्ये मास्क वापरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. ‘माझे कुटुंब, माझे जबाबदारी’ या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. घरा बाहेर पडण्या आधी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे असे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या.
येणारे नवरात्र उत्सव, दिवाळी सण नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरे करावेत. याबाबत शासनाने नियमावली तयार केली आहे. अटी व शर्थी याचे 100% पालन करण्यात यावे. विनाकारण गर्दी करू नये. कारण कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येकानी सुरक्षित अंतर पाळावे, मास्क वापरावे, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन सोलापूर जिल्ह्याच्या नुतन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शेवटी केले. याप्रसंगी डीवायएसपी संतोष गायकवाड, पो.नि. के.एस. पुजारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.









