तरुण भारत संवाद पंढरपूर/प्रतिनिधी
यंदाच्या मोसमातील परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज, रविवारी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, वैरागसह परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे तालुक्यातील कांदा, मका, ऊस, केळी, डाळिंब, द्राक्षे आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारपासून प्रारंभ केला आहे. शनिवारी शहर व तालुक्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला तर रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान ढगांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यासह पावसाने पंढरपूर शहर तालुक्याचे क्षेत्र व्यापून टाकले. अचानक आलेल्या पावसाने शेतामधील कामाचे नियोजन कोलमडले तर शहरातील भाजी मार्केट, रहदारीच्या परिसरातील लोकांची धावपळ उडाली.
दुपारी तीन वाजता सुरू झालेला पाऊस कोसळतच होता. झालेल्या पावसामुळे कासेगाव, रोपळे, तुंगत, नारायण चिंचोली, ईश्वर वठार, देगाव कोर्टी, बोहाळी, खर्डी आदी भागातील पिकात पाणी साचले आहे शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पावसाचे पाणी साचल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. पडणा-या पावसाचा अंदाज घेऊन शेताकडून काम आटपून शेतकरी-शेतमजूर यांनी पडत्या पावसात घर गाठले.