प्रतिनिधी / सोलापूर
पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल 2021 रोजी होत असून या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (80 वर्षांवरील), कोविड 19 संशयित आणि कोविडग्रस्त रूग्णांना मतदान करता यावे, म्हणून टपाली मतपत्रिका पुरविणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राजकीय पक्षांच्या बैठकीत दिली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक झाली. बैठकीला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे मनीष गडदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिलिंद गोरे, भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी, शिवसेनेचे विजय पुकाळे, बहुजन समाज पार्टीचे अर्जुन जाधव उपस्थित होते.
शंभरकर यांनी प्रतिनिधींना निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक जाहीर झालेपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पक्षाच्या नेते, प्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. मतदान प्रक्रिया, प्रचार यामध्ये कोविड 19 च्या नियमांचे पालन करणे अत्यंत जरूरीचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडच्या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावर एक हजारपेक्षा कमी मतदार संख्या असणे आवश्यक आहे. यामुळे मुख्य मतदान केंद्रे 328, सहायकारी मतदान केंद्रे 196 अशी एकूण 524 केंद्रांचा प्रारूप प्रस्ताव सर्व पक्षीय प्रतिनिधींना देण्यात आला. यावर कोणाचाही आक्षेप किंवा सूचना प्राप्त झाली नसल्याने प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावर लागणारे बॅलेट युनिट 1050, कंट्रोलिंग युनिट 1016, व्हीव्हीपॅट 1009 एवढ्या मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. 3150 मनुष्यबळ पुरविण्यात आले असून कोविड 19 च्या अनुषंगाने आरोग्य पथकांचीही नियुक्ती कली असून राजकीय पक्षांनी मतदान बुथवर प्रतिनिधी नेमताना कोविड 19 च्या सूचनांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर यांचे पालन करण्याच्या सूचनाही श्री. शंभरकर यांनी दिल्या