प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील सिना नदीवरील शासनाच्या वाळूउपसा धोरणातील नियमांचा बोजवारा उडवला जात आहे. तालुक्यातील तरटगाव, पोटेगाव, संगोबा येथे आज जेसीबी अन् पंपाचा वापर करीत बेसुमार पद्धतीने वाळू उपसा केला जात असून भिंगी मातीचीही तस्करी केली जात असताना महसूल प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.
शासन निर्णयानुसार वाळू उपसा करण्यास निर्बध घातले आहेत; परंतु या नियमाचा तालुक्यात बोजवारा उडाला असताना नियंत्रण ठेवणारे तहसील कार्यालय बेफिकीर असून पोलीसांचेही अवैध धंदेवाल्यांना पाठबळ असल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी वाळूबरोबर भिंगी मातीचे उत्खनन केले जात आहे. नदी काठावरील भिंगी मातीचा शेकडो ब्रास साठा या परिसरात राजरोसपणे पहावयास मिळत आहे. या शिवाय वाळूचा जेसीबी व पंपाचा वापर करीत बेसुमार पद्धतीने उपसा केला जात आहे. नियमानुसार नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी, सक्शन पंपाचा वापर करता येत नसून एक मीटर खोलीपर्यंतच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. असे असताना वाळू, भिंगी, रेतीचा जेसीबी, पंपाच्या सहाय्याने दोन ते अडीच मीटर खोलीपर्यंत उपसा चालू आहे. शासन नियम उघडपणे मोडीत काढून नदी पोखरण्याचा उद्योग चालू असताना तक्रारी करूनही नियंत्रण ठेवणार्या तहसीलदारांसह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे.
परिणामी परिसरातील पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने जैवविविधता धोक्यात आली आहे. वाळू तपासणी करणार्या संबंधित अधिकार्यांना जेसीबीने वाळू उपसा होत असल्याचे दिसत असतानाही महसूल यंत्रणा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही. यामुळेच वाळू तस्करीत अनेकांचे हात गुंतले असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतून होत आहे.









