शहरातील मोठ्या 17 शॉपिंग सेंटरचा समावेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
महापालिकेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. तशा शासनाच्या सूचना व आदेश आहेत. त्याअनुषंगाने शहरातील मोठ्या 17 शॉपिंग सेंटर बाबत येत्या दोन दिवसात रेडीरेकनर नुसार गळ्यांचा लिलाव होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
महापालिकेचे 17 मोठे शॉपिंग सेंटर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी हे गाळे आहेत, त्या त्या ठिकाणी रेडीरेकनर चा जादा भाव किंवा बाजारभाव जास्त असेल, तर त्यानुसार जो दर जास्त आहे, त्यानुसार संबंधित गाळेधारकांना नोटीस द्वारे कळविण्यात येईल. गाळेधारकांनी पंधरा दिवसाच्या कालावधीत रेडीरेकनर किंवा बाजारभावाप्रमाणे शिल्लक व थकीत भाडे भरून तत्काळ गाळे आपल्या नावावर करून घेणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात गाळेधारकांनी नोटिसीला योग्य प्रतिसाद दिला नाही, तर पुढील दोन दिवसात ई-टेंडर पद्धतीने शहरातील गाळ्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
गाळेधारकांना कोर्टात जाता येणार नाही
रेडीरेकनर किंवा बाजारभावा प्रमाणे गाळेधारकांबाबत प्रक्रिया करणे भाग आहे, असे शासनाचे आदेश व सूचना आहेत. महापालिका शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रक्रिया पार पाडत असल्याने गाळेधारकांनी सहकार्य करावे, त्यांना न्यायालयात जाता येणार नाही. –पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा
Previous Articleलॉकडाऊनमध्ये म्हासुर्लीच्या राजू सुतारने बनविले मळणी मशीन
Next Article कोल्हापूर : बार उघडले…, मंदिरं कधी ?









