कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना मिळाला असता आधार
सोलापूर / परशुराम कोकणे
सोलापूरसाठी 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि 100 खाटांचे सिव्हील रुग्णालय 2013 साली तत्कालीन राज्य शासनाने महाराष्ट्राच्या बृहत आराखडÎामध्ये मंजूर केले होते. या कामाचे उदघाटन होवून दोन वर्ष होत आली तरी बांधकाम संथगतीने सुरु आहे. सध्या या रुग्णालयांकडे कोणाचेही लक्ष नाही. कोरोनामुळे एकीकडे रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र असतानाही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱयांचे शासनाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे.
सोलापुरात नव्याने रुग्णालय व्हावे यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 2014 च्या अर्थसंकल्पामध्ये याकरिता निधीची तरतूदही करण्यात आली. शासनाच्यावतीने महिला व शिशु रुग्णालय शहराच्या पूर्व भागामध्ये व्हावे अशी आमदार प्रणिती शिंदे यांची इच्छा होती, कारण या परिसरामध्ये कोणतेही सरकारी रुग्णालय अस्तित्वात नाही. 100 खाटांचे सामान्य रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल गुरुनानक चौक परिसरातील जुने पोलीस आयुक्तालय येथील मोकळÎा जागेमध्ये प्रशस्त बनावे या करीता नियोजन सुरू होते.
पूर्व भागात शासनाची जागा मिळत नसल्याने महानगरपालिकेच्या मालकीची सुत मिल जवळील जागा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याप्रमाणे नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्यामार्फत मनपा सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत ठराव झाला. त्यानुसार महानगरपालिकेने ती जागा आरोग्य विभागास देण्याची सहमती दर्शवली. परंतु काही दिवसातच आचारसंहिता लागल्यामुळे हे काम थांबले.
2014 मध्ये नव्याने राज्यात भाजपचे सरकार आले व सोलापूरच्या या दोन्ही रुग्णालयांच्या फाईल धूळ खात पडल्या होत्या. 2019 विधानसभा निवडणुकी आधी शहरासाठी काही तरी काम केले आहे हे दाखवण्यासाठी या दोन्ही रुग्णालयांचा एकत्रित भूमिपूजनाचा कार्यक्रम जुने पोलीस आयुक्तालय परिसरात झाला व कामही सुरू झाले. याठिकाणी अठरा-अठरा कोटींची दोन स्वतंत्र रुग्णालये उभारत असून याकरिता शासनाने निधीही दिला आहे, परंतु या प्रश्नाचा पाठपुरावा योग्य रितीने होत नसल्यामुळे आजही रुग्णालयांच्या इमारतीचे काम संथगतीने चालू आहे.
आजची आरोग्य स्थिती पाहता ही दोन्ही रुग्णालये बांधून तयार असती तर कोरोना संकटाच्या काळात सोलापूरची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट राहीली असती. सोलापूरसाठी 2013 साली मंजूर झालेले रुग्णालय अद्यापही जनतेच्या सेवेत रुजू होऊ शकले नाही यातून स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची आणि येथील लोकप्रतिनिधींची उदासिनता दिसून येते. या उलट पुण्यातील ससून रुग्णालय येथील तीन मजल्याचे काम थांबल्याची माहिती तेथील पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोरोना आपत्ती स्थिती आढावा बैठकीत समोर आल्यानंतर त्यांनी तत्काळ पाठपुरावा सुरु केला. त्याकरिता निधीही उपलब्ध करून दिला.
सोलापूरच्या पालकमंत्र्यांनीही अशीच आढावा बैठक घेऊन माहिती घेतली असती तर याबाबत योग्य कामकाज झाले असते सद्यस्थितीत दोन्ही रुग्णालयाच्या दोन-तीन मजल्यांचे स्लॅब झाले आहे. तात्पुरती सुविधा करून हा परिसर वापरात आणला जावू शकतो. या दोन्ही हॉस्पिटलबाबत किमान आपल्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तरी माहिती देण्यात आली आहे किंवा नाही याबाबतही शंका आहे.
कोविड सेंटर म्हणून वापरात आणणे शक्य
कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रशासनाकडून जागांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून समोरासमोर 200 खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. याकडे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. हे काम वेगाने पूर्ण करुन घेतले किंवा आहे त्या स्थितीत हा परिसर कोविड सेंटर म्हणून वापरात आणणे शक्य आहे. – बाबा मिस्त्री, नगरसेवक
निधी अपुरा पडत असल्याने अडचणी
दोन्ही रुग्णालयांचे बांधकाम सुरु आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे काही काळ काम थांबले होते. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. निधी आधी मंजूर झाला पण टेंडर नंतर झाले. त्यामुळे खर्च वाढला आहे. निधी अपुरा पडत असल्याने अडचणी येत आहेत. कोरोना काळात हे काम पूर्ण करुन इमारत वापरात आणता येईल यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला.









