प्रतिनिधी / करमाळा
थकीत एआरपीप्रकरणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या गोंधळप्रकरणात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी बागल गट व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कार्यकर्ते सोमवारी (ता. १३) वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आले होते.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर करमाळ्यात कायदा व सुव्यवसंस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सात अधिकारी व रासीएफच्या जवानांसह ४० पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोकणे यांनी दोन्हीही मोर्चेकरांची समजूत काढून परस्थिती हाताळली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी बागल यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे निवेदन पोलिसांना दिले होते. शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यातच तुपकर यांनी रविवारी बागल यांचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात येत असल्याचे सांगत डोळे काढण्याचे विधान करत जशाच तसे उत्तर देणार असल्याचे सांगितले होते. त्यावर बागल गटाचे कार्यकर्तेही एकत्र आले होते.
बागल गटानेही तुपकर यांना जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. बागल गटाच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर अनेकांनी मनोगत व्यक्त केले. त्याला तेव्हा सभेचे स्वरूप आले होते. यावेळी रश्मी बागल यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्वभामिनी शेतकरी संघटना मोर्चा काढणार म्हटल्यावर बागल गटानेही शक्तिप्रदर्शन करत निवेदन देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान अनेक कार्यकर्ते पोलिस ठाण्याकडे निघाले. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर प्रशालेसमोर पोलिस निरीक्षक कोकणे यांनी मोर्चेकरांना आढवले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना तेथेच निवेदन देण्यास सांगितले. त्यासाठी नायब तहसीलदार सुभाष बदे यांना तेथेच बोलावले. त्यावेळी कोकणे यांना मोर्चेकरांना रोखण्यात यश आले. तेव्हा डॉ. हिरेही उपस्थित होते.
तुपकर यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे पण आमच्याविरुद्ध येथे येऊन कोण काय बोलले तर सहन करणार नाही. त्याला जशाच तसे उत्तर देऊ असे सांगितले होते. बागल गटाचे कार्यकर्ते यांना तेथूनच माघारी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मोर्चा शेतकरी संघटनेकडे वळवला. तुपकर हे जामखेड रोडने येणार असल्याने गॅस गोडाऊनच्या काही अंतरावर असलेल्या हॉटेल साक्षीजवळ पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनाही परिस्थितीची माहिती देण्यात आली.
शेतकरी संघटनेचा मोर्चा पोथरे नाका येथून निघणार होता. मात्र त्यानंतर त्यांचा मोर्चा गायकवाड चौक येथून काढण्यात आला. करमाळ्यात आंदोलने असतील तर अनेकदा निवेदनही प्रवेशद्वारावर देण्यात येतात. आज मात्र तेथून लांबच त्यांनाही थांबवले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. दोघांचीही समजूत काढत पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.कॉलेजच्या पोलिसांनी बागल यांच्या निवासस्थानीही बंदोबस्त ठेवला होता.