मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाप्रमुख बरडे यांची मागणी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
शहरात जुना पुणा नाका येथे शेळगी कडून येणारा नाला पुणे नाका स्मशानभूमी, गणेश नगर, अवंती नगर, आर्यनंदी नगर, थोबडे नगर, अल्ली नगर, वसंत विहार, गुलमोहर सोसायटी आदीसह नवीन वसलेल्या नगरीतून शेळगी नाला जातो. नाल्याच्या परिसरात अनेक बांधकामे करुन नाल्याचे पात्र कमी केले आहे. त्यामूळे पावसाळ्यात येथील रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले आहे. या प्रकाराला जबाबदार तत्कालीन मनपा आयुकत व नगरअभियंता यांच्यावर फ़ौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली आहे.
पूर्वी शेळगी नाल्याचे पात्र मोठे होते. मोठी अतिवृष्टी झाली तरीही पावसाचे पाणी पात्रातूनच वाहत देगाव ओढ्यास मिळत होते. सध्या या ओढ्याच्या दोन्ही बाजूस वसाहती व मोठमोठया वसाहतीसह रुग्णालये उभारल्याने या ठिकाणी काँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. सदर वसलेल्या नगरीचे ले-आऊट मंजूर करताना, बांधकाम परवाने मंजूर करताना महानगरपालिकेच्या त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी पाहणी न करता व बेकायदेशीरपणे ले-आऊट मंजूर करुन बांधकाम परवाने दिले आहेत. या बेकायदेशीर वसलेल्या वसाहती व बांधकामामुळे नाल्याचे पात्र अरुंद झाले आहे. तसेच १४ कमानी व त्यापुढे देगावकडे जाणारा नाला हा वेळोवेळी साफ केले नाहीत. याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदरील परिसरात अतिवृष्टीमुळे लाखो रुपये खर्चून स्वप्नवत बांधलेल्या घरात ड्रेनेज पाण्यासह पावसाळी पाणी शिरले आहे.
येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात आली नाही. या नाल्याच्या बाजूला वसलेल्या नगरीत महानगरपालिकेतील अधिकारी वर्ग व मनपा सेवक वास्तव्यास आहेत. सदरची नागरी वस्ती निर्माण करताना बिल्डर लॉबीने महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने नैसर्गीक शेळगी नाल्याची रुंदी कमी करीत त्याचा फायदा घेतला. स्वतःसाठीही मोठ्या जागा पदरात पाडल्या आहेत. त्यामुळे आजच्या नैसर्गीक पुरपरिस्थितीला सदर बिल्डरसह तत्कालीन महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली आहे.