प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथे घराचा कडी कोयंडा उचकटून कुलूप मोडून कपाटात ठेवलेले सोने चांदी व रोकड असे ५२५०० रुपयेचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले ही घटना दि ३१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील संजयकुमार रावतप्पा कोळी वय ४१ वर्षे हे दि ३० जुलै रोजी रात्री जेवण करून घराला बाहेरून कुलूप लावून घरातील सर्वजण वरच्या मजल्यावर झोपी गेले असता पहाटे साडे पाच वाजता उठून खालच्या घरात जात असताना जिन्यास असलेले दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडला नाही म्हणून गच्चीवर जाऊन शेजारी राहणाऱ्या भावाला सांगून दरवाजा उघडला. तेव्हा लावलेला कुलूप व दरवाज्याची कडी तुटलेली दिसली व दरवाजा उघडा होता.
जवळ जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट हे कशाच्या तरी साहाय्याने उघडून आतले सामान अस्ताव्यस्त करून आतील लॉकरची चावी काढून ३५ हजार किंमतीचे सोने त्यात सोन्याची चैन, कर्णफुले, अंगठी, ४५०० किंमतीचे चांदीचे दागिने, व १३ हजार रुपये असे एकूण ५२५०० रुपयेचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.याबाबत संजयकुमार रावतप्पा कोळी यांनी तक्रार दिली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मल्लिनाथ कलशेट्टी हे करीत आहेत.