भाविकांशिवाय प्रथमच नवरात्रोत्सव
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/वैराग
तडवळे (ता. बार्शी) येथील जागृत देवस्थान श्री. भगवतीदेवीचा शारदेय नवरात्रोत्सव येत्या घटस्थापनेपासून म्हणजे १७ तारखेपासून सुरू होत आहे. मात्र शासनाच्या आदेशानुसार भगवती मंदीर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. त्यामुळे या वर्षी प्रथमच भाविकांशिवाय नवरात्रौत्सव केवळ पुजारी, मानकरी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
भगवतीदेवीचा नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवासाठी पंचक्रोशीसह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, रायगड, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर आदी तालुक्यांतून भाविक येत असतात. नऊ दिवस मंदीर आणि संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणासह विद्युत रोषणाईने न्हाऊन निघते. देवस्थान ट्रस्ट, हेल्पिंग हॅण्ड, आराधी मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शांत राहणार आहे.
केवळ परंपरा म्हणून निवडक मानकरी आणि पुजारी हे नऊ दिवस देवीची विधीवत पूजा करून मंदिराच्या आवारातच छबिना काढतील.शासनाच्या आदेशानुसार अन्य कोणतेही कार्यक्रम करता येणार नाहीत. या बाबतची एक बैठक वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी घेतली असून नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. या बैठकीचे स्वागत रामकृष्ण लोखंडे यांनी तर आभार संजय आवारे यांनी मानले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाप्रमाणे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याने सर्व पारंपारिक विधी साध्या पद्धतीने मानकरी, पुजारी व विश्वस्त हे करणार आहेत. सर्व भक्तांनी जागतिक महामारीचे संकट लक्षात घेऊन सहकार्य करावे. – राम पाटील, अध्यक्ष, श्री भगवती देवी देवस्थान ट्रस्ट