नगरसेवक विनायक विटकर यांचे टेंडरद्वारे काम देण्याची मागणी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
नगरसेवकांना 2 लाखापुढील कामाचे टेंडर काढण्यासाठी सांगितले जाते. मात्र स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध कामांसाठी टेंडर न काढताच पुर्वीच्या मक्तेदारास 5 कोटींचा निधी दिला आहे. तरी संबंधीत कामांसाठी नियमानुसार टेंडर काढून काम देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे नगरसेवक विनायक विटकर यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे.
शासनाचे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सन २०२०-२१ सालासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध कामे करण्याविषयी आदेश देण्यात आला आहे. यामध्ये १२ कोटी रकमेची कामे सुरु आहेत. यामध्ये शहरातील सार्वजनिक शौचालय बांधणे, दुरुस्ती करणे, स्वच्छतागृहे बांधणे व दुरुस्ती करणे तसेच त्याअनुषंगिक कामे करणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश आहे.
गेल्यावर्षी याच बजेट सदरातून टेंडर प्रक्रियेद्वारे निविदा मागवून मंजूर मक्तेदाराकडून गतवर्षीच्या बजेटमधून वरील कामे करण्यात आलेली आहेत. परंतू सध्या सन २०२०-२१ सालाचे घनकचरा अंतर्गत निधी उपलब्ध झालेला असून, त्या निधीतून पाच कोटी रकमेचे टेंडर न काढता, मागील मंजूर मक्तेदारांकडून त्याच दराने कामे करुन घेण्यात येत आहेत. परंतु मागील मंजूर मक्तेदाराचे दर अवाजवी, निकृष्ट दर्जाचे काम पाहता यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समजते, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पारदर्शकता ठेवून नियोजनबध्द पध्दतीने कामे होण्यासाठी शासनाच्या नियमानुसार जाहिर प्रसिध्दीकरणाने अल्पमुदतीची निविदा मागवून टेंडर प्रक्रियेद्वारे कामे द्यावी.
यामध्ये स्पर्धात्मक दर येऊन मनपाचा आर्थिक फायदा होऊन, काम चांगल्या प्रकारे होण्यास मदत होणार आहे. तरी सदर निधीतून कामे करावयाची असल्यास नव्याने जाहिर प्रसिध्दीकरणाद्वारे अल्पमुदतीची निविदा मागवून कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक विनायक विटकर यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे.
आचारसंहितेमुळे निर्णय
सध्या आचारसंहिता लागू आहे. टेंडर काढता येत नाही. तसेच आलेला निधी परत जावू शकतो. त्यामूळे शहराच्या विकासासाठी पुर्वीच्या मक्तेदाराकडून 2017-18 च्या दरा नुसार काम करुन घेतले जात आहे. काम दर्जेदार न झाल्यास संबंधीतावर कारवाई केली जाईल.
-पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा









