प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्हयातील 657 पैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित 590 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 2325 केंद्रांवर प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 80 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील किरकोळ घटनेचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्हयात शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले असून याची मतमोजणी सोमवारी त्या त्या तहसील स्तरावर करण्यात येणार आहे.
दरम्यान, मतदानाला काही तास शिल्लक असतानाच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथील एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सायबण्णा बिराजदार (वय 58) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. बिराजदार यांना गुरूवारी हदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
590 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 6 लाख 62 हजार 904 पुरूष तर 6 लाख 23 हजार 2 असे एकूण 12 लाख 85 हजार 921 मतदार मतदानास पात्र होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 70.10 टक्के म्हणजेच 9 लाख 1 हजार 774 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या तासाभरात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. तळे हिप्परगा येथे दोन गटात वाद झाल्याने तेथे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलिसांनी वाद मिटविल्याने तणाव निवळला. येथील केंद्राला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदारांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळ तालुक्यातील शेटफळ व सावळेश्वर येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांना ने आण करण्याच्या कारणावरून किरकोळ वादावादी झाली. अनेक ठिकाणी उमेदवार हमरी तुमरीवर आल्याचे सांगण्यात आले.
रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार बार्शी 81.99 टक्के, मोहोळ 82.37 टक्के, मंगळवेढा 79.59 टक्के, अक्कलकोट 75.86 टक्के, माढा 84.91 टक्के, सांगोला 82.00 टक्के, पंढरपूर 84.66 टक्के, माळशिरस 77.45 टक्के, करमाळा 84.04 टक्के, उत्तर सोलापूर 77.00 टक्के, दक्षिण सोलापूर टक्के मतदान झाले आहे.
कोरोना नियमावलीचा फज्जा
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक केंद्रांवर कोरोना संसर्गापासून बचावासाठी करण्यात आलेल्या नियमावलीचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात आले नाही. मतदारांच्या चेहर्यावर मास्क नव्हते. सॅनिटायझर केवळ नावालाच होते. थर्मलगनही कुठे दिसले नाहीत. मतदारांनाही कोरोनाचे भय नसल्याचेच दिसून आले. प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही कोरोनाच्या बाबतीत गाफीलपणा दिसून आला.
Previous Articleकोरेगावात टेम्पो ट्रॅव्हलरची मोटारसायकलला धडक, एकजण जागीच ठार
Next Article गुहागरमध्ये कोविशील्ड लस दाखल, शनिवारी लसीकरण









