15 मेपर्यंत संचारबंदी, मंगळवार, बुधवार शहरात असणार शिथील
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. रविवारी कडक लॉकडाऊन पहिला दिवस होता. शहरासह ग्रामीण भागातही प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडलेले आणि अत्यावश्यक सेवेतील लोक रस्त्यावर दिसून आले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. शनिवारी सायंकाळपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. शहरासह तालुकास्तर आणि गावागावामध्ये रविवारी दिवसभर शुकशुकाट दिसून आला. रुग्णालयात जाणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, औषधे आणायला निघालेले लोक तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील लोकच रस्त्यावर दिसून आले.
लॉकडाऊनमुळे पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसर ओस पडला होता. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी सोहळा साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. सोलापूर शहरात येणाऱया सर्वच रस्त्यांवर पोलीसांनी नाकाबंदी केली होती. तसेच प्रमुख रस्त्यावर पोलीसांची गस्त दिसून आली. जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. येत्या 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंगळवार आणि बुधवारी सोलापूर शहरात रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयासाठी कडक लॉकडाऊन शिथील करण्यात येणार असून या दोन्ही दिवस सकाळी 7 ते 11 यावेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि विक्री करता येणार आहे.









