जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाय योजना करीत आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी नवीन 14 ठिकाणी प्लॅंन्ट बसवत असून 48 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन प्राप्त आहे. सर्व डॉक्टरांना ऑक्सिजन बचतीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासन कडक उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असून अनेकांचा मृत्यू होत आहे. जिह्यात ऑक्सिजनची परिस्थिती काय आहे या विषयी जिल्हाधिकारी शंभरकर यांना विचारल्यास ते म्हणाले, जिह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. 48 मेट्रिक टन ऑक्सीजन प्राप्त झाला आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज आहे त्या ठिकाणी वितरित करत आहोत. जिल्ह्यातील 115 हॉस्पिटलमध्ये पाच अभियंता महाविद्यालयाच्या तज्ञांना पाठवून त्रुटी दूर करून फायर ऑडिट केल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
कोणत्या कोणत्या तालुक्मयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्याचे ऑडिट करून त्या रुग्णालयात त्वरीत ऑक्सिजन पाठवण्यात येत आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी 43 जणांना परवानगी दिली आहे. शहर जिह्यातील काही प्लाटमधून हवेतून ऑक्सीजन निर्मिती होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही आणि भासूही देणार नाही, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.









