प्रतिनिधी / करमाळा
जिल्हा बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी घेतलेला निर्णय अभिनंदनीय असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्ज तात्काळ मिळेल असा हा धाडसी निर्णय शैलेश कोतमिरे यांनी घेतल्याबद्दल त्यांचे शिवसेनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शैलेश कोथमिरे यांचा विशेष अभिनंदन करून त्यांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा देण्यात आल्या व लवकरच त्यांचा हा निर्णय घेतल्याबद्दल करमाळा शिवसेनेच्यावतीने सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज घेताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता, शिवाय सोसायटीचे सचिव, संचालक, चेअरमन, जिल्हा बँकेचे संचालक आदींचे उंबरठे झिजवावे लागत होते, यात राजकारण होऊन गरजू लोकांना शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नव्हते, शिवाय बँकेचा व्याजदर याशिवाय दोन टक्के अतिरिक्त व्याज शेतकऱ्यांकडून वसूल केले जात होते, शेतकऱ्यांना वेळेच्या वेळेवर हिशोब मिळत नव्हता आता या सगळ्या कटकटीतून शेतकरी मुक्त होऊन स्वतंत्र होणार आहेत.
जिल्हा बँकेत थेट शेतकऱ्यांना आता कर्जपुरवठा करणार असल्यामुळे शेतकर्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा बँक ते थेट शेतकरी कर्ज वाटप होणार असल्यामुळे आता मधल्या लोकांकडून होणारी मुस्कटदाबी तून शेतकरी मुक्त होणार आहे.
या कर्ज पुरवठ्यामुळे नाबार्डच्या योजना विविध शासकीय केंद्र सरकार राज्य शासन योजना पात्र होणारे शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा होणार असल्यामुळे अनुदान सुद्धा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, त्याशिवाय पिक कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, पाईपलाईन कर्ज, शेतीसुधारणा कर्ज, घर बांधण्यासाठी कर्ज या सर्व प्रकारची कर्ज जिल्हा बँकेमार्फत एका शेतकऱ्याला थेट मिळणार आहेत. आणि थेट कर्ज मिळाल्यामुळे शेतकरी सुद्धा वेळच्या वेळी थेट बँकेत हप्ते भरून आपली प्रगती करून घेईल.
जिल्हा बँकेवर प्रशासक असलेले शैलेश कोतमिरे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी राजकारणी लोकांच्या तावडीतून मुक्त केला आहे. आता शेतकऱ्याला कुठल्या सोसायटीच्या सभासद व्हायची गरज नाही व कुठलाही पुढाऱ्याच्या दारात द्यायची गरज नाही. तो थेट बँकेत जाऊन कर्ज घेऊ शकतो. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे ,भरत अवताडे, माजी तालुकाप्रमुख शाहू फरतडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.









