प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अंगणवाडीमधील बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी 50 दिवसांसाठी बाल आधार नोंदणी या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सहा वर्षापर्यंतच्या 79 हजार 223 इतक्या बालकांची लवकरच आधार नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी शंभर आधार मशीन विविध ठिकाणी उपल्बध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत 6 वर्षापर्यंतच्या बालकांची आधार नोंदणी अत्यावश्यक आहे. या मोहिमेसाठी महाआयटी, महाऑनलाईन, पोस्ट तसेच बँक यांचेकडील सुमारे 100 मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यानुसार आठवड्यात सोमवार ते शुक्रवार बालकांची आधार नोंदणी करण्यात येत आहे, असे सीईओ स्वामी यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलांचे आधार नोंदणी करुन पालकांनी स्वतःचेही आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी जावेद शेख यांनी यावेळी केले.









