करमाळा / प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या बैठकीला करमाळा येथील रश्मी बागल यांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीला माजी आ. दिलीप सोपल, करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे, आ. बबनदादा शिंदे, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. राजन पाटील, माजी आ. दिलीप माने, सिद्धराम म्हेत्रे, बबनराव अवताडे, मनोहर डोंगरे, सुरेश हसापुरे उपस्थित होते.
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या इच्छुकांना तालुकानिहाय कक्षात बोलून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी उत्तर सोलापूरमधून कोणीच आले नव्हते तर करमाळा तालुक्यातून तीन गट आले होते. करमाळ्याचे विद्यमान संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, संचालक दीपक माळी, दक्षिणचे माजी सभापती अशोक देवकाते, प्रभाकर कोरे, बार्शीचे योगेश सोपल यांनी चर्चेसाठी हजेरी लावली.
दूध संघाच्या निवडणुकीत सोसायट्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या कमी आहे. गेल्या निवडणुकीत माजी मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या विनंतीवरून बार्शीची जागा सोडून मंगळवेढ्याला द्यावी लागली होती. तसे ऍडजेस्टमेंट करण्यासाठी नेत्यांशी चर्चा करू, असे सोपल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सुमारे चार तास बैठक झाली. दूध उत्पादकांनी सत्तेची सूत्रे आमच्या हाती द्या म्हणून आग्रह धरला तर त्यावर माजी आमदार सोपल यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची संघाचे परंपरा असल्याचे सांगितले. यावेळी बचाव पॅनल व तालुक्यातील उमेदवारांची मते जाणून घेऊन माजी आमदार सोपल, आमदार शिंदे, माजी आमदार पाटील यांनी बंद खोलीत तासभर चर्चा केली. यावेळी आमदार परिचारक, माजी आमदार माने, सिद्धाराम म्हेत्रे, अवताडे गप्पा मारत बाहेर लक्षात बसून होते.
आमदार शिंदे या बैठकीला उशिरा आले. उमेदवारांच्या मुलाखतीनंतर ते निघून गेले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी माघार घेण्याची मुदत मंगळवारी आहे. ही फक्त प्राथमिक चर्चा झाली. बचाव समितीने त्यांचे म्हणणे मांडले दूध संघाला बिनविरोधची परंपरा आहे. त्यानुसार हे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आणखी बैठका घेतल्या जातील, असे सोपल यांनी सांगितले.
उमेदवारी भरतानाच दूध उत्पादकांनी आम्हाला सांगितले असते तर त्यांच्या प्रस्तावावर विचार करता आला असता. आता अचानकपणे हा प्रस्ताव आल्याने विचार करावा लागेल, असेही सोपल यांनी सांगितले आहे. निवडणुकीत दूध संघ बचाव कृती समितीच्या माध्यमातून उत्पादकांनी उडी घेतली आहे. या पॅनलचे प्रमुख भाऊसाहेब धावणे, नदाफ यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आतापर्यंत राजकीय मंडळींची दूध संघावर सत्ता होती संघ वाचवण्यासाठी केवळ एकवेळ उत्पादकांच्या ताब्यात द्या, असा प्रस्ताव मांडल्याचे दवणे यांनी सांगितले.









