जि. प. आरोग्य विभागातील कर्मचार्यांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी
प्रतिनिधी / सोलापूर
शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचार्याचे निलंबन केल्यानंतर त्या कर्मचार्याला तीन ते सहा महिन्यात कामावर हजर करून घेतले जाते. परंतु जि. प. आरोग्य विभागातील एनआरएचएम मधील पाच कर्मचार्यांना चौकशी अहवाल येउनही गेल्या चौदा महिन्यांपासून कामावर हजर करून घेतले नाही. चौदा महिने होउनही न्याय न मिळाल्याने अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघातर्फे उद्या, 29 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जि. प. आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत 5 कर्मचार्यांची 14 महिन्यापूर्वी तात्पुरती सेवा समाप्त केली होती. पुढे चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या कर्मचार्यांना कामावर हजर करून घेतले नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी हे एका जि. प. सदस्याच्या दबावास, राजकारणास बळी पडत आहेत. या 5 कर्मचार्यांना 14 महिन्यांपासून मानधन दिले नाही. परिणामी कर्मचार्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सदरचे प्रकरणे यापुढे प्रलंबीत न ठेवता तत्काळ निकाली काढावे.
अन्यथा यातील कर्मचार्यांने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यास याची जि. प. प्रशासन जबाबदारी घेणार आहे का असा प्रश्न अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघातर्फे उपस्थित करत या कर्मचार्यांना न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषन करणार असल्याचे शहराध्यक्ष अमित गायकवाड यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मुख्य संघटक विनोद सोनवणे, बाळासाहेब बनसोडे, मनोज सोनकांबळे आदी उपस्थित होते.
Previous Articleकोरोनात सत्ताधाऱ्यांनी राजकारण करु नये – देवेंद्र फडणवीस
Next Article सांगली जिल्हय़ाची रूग्णसंख्या दहा हजार पार









