ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशांसाठी असणार सोय
परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक विकास कदम यांची माहिती ः पदवीच्या परीक्षा 6 मे पासून तर पदवीत्तर 9 मे पासून
प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहर जिह्यात वाढत्या कोरोनामुळे, कडक संचारबंदीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन घेण्याचे नियोजन झाले असून आता या परीक्षा 6 मे पासून सुरुवात होणार आहेत. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ऑनलाइन परीक्षा देण्याची सोय असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक विकास कदम यांनी तरुण भारत संवादशी बोलताना दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम वर्षातील बीए, बीकॉम, बीएस्सीच्या परीक्षा 6 मेपासून तर एम. ए,एमएससी, एम कॉम, एमबीए अशा विषयाची सत्र परीक्षा तर अभियांत्रिकी, फार्मसी च्या विद्यार्थ्यांची प्रथम व द्वितीय वर्षातील प्रथम सत्र परीक्षा 9 मे पासून घेण्याचे नियोजन झाले आहे. यासाठी 119 महाविद्यालयातील तब्बल 40 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. द्वितीय सत्रातील बॅकलॉगचे ही परीक्षा होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा देण्याची सोय असणार आहे. त्याच बरोबर परीक्षेच्या दिवशी नेट,लाईट जावू नये म्हणून संबंधित विभागांना पत्र पाठवण्यात आल्याचेही कदम यांनी सांगितले.
व्हिडीओ क्लिपद्वारे 1 मे रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची, कसे सोडवायचे, सत्र कसे असणार या मार्गदर्शक माहितीचे व्हिडिओ क्लिप विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्हिडीओ क्लिप मधून कोरोनाबाबत जनजागृतीही करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
अजून काय म्हणाले, कदम
– बीए, बीकॉम, बीएस्सीच्या परीक्षा सहा मेपासून तर एमए,एमकॉम, एमएससी, इंजिनिअरिंगच्या परीक्षा 9 मे सुरुवात
– परीक्षा संदर्भात कोणतीही अडचण असल्यास पाच हेल्पलाईन नंबर वर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा
– लॉगिन अथवा ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही अशांनी अर्ज करावे नंतर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल
– परीक्षा काळात नेटवर्क व लाईट जाऊ नये म्हणून संबंधित विभागांना पाठवले पत्र
ऑनलाइन परीक्षेची तयारी पूर्ण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिपद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लवकरच ऑनलाइन पध्दतीने कॅलिपचे विद्यार्थ्यांचे डेमो घेतले जाईल. विद्यार्थ्यांना कोणती अडचण असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा. – विकास कदम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ