जिल्हा नियोजन येथील बैठकीत पंढरपूर येथे शिथिलता नाही, संचारबंदी राहणार
पंढरपूर, माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा या तालुक्यांत संचारबंदी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूर, माढा, सांगोला, माळशिरस, करमाळा या तालुक्यात उद्यापासून (ता. 13) संचारबंदी सुरू होणार आहे. दरम्यान पंढरपूर शहरात शिथिलता द्या या मागणीसंदर्भात वारकरी, राजकीय पक्षासोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र निर्बंधात शिथिलता देण्यात आली नाही.
या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीवकुमार जाधव, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह विविध अधिकारी व पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, मनसे नेते दिलीप धोत्रे, राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे, सचिन पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पंढरपूरसह चार तालुक्यांत कोरोना वाढत असल्यामुळे काहीच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले होते. मात्र पंढरपुरात संचारबंदीला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा संसर्ग पाच तालुक्यांत कसा वाढला आहे याची माहिती दिली. संचारबंदी कायम राहणार असून निर्बंधात शिथिलता न देण्याची स्पष्टोक्ती शंभरकर यांनी दिली.