प्रतिनिधी/बार्शी
तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्गामुळे वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक असल्याने येणाऱ्या पुढील काळात खबरदारी म्हणून जास्तीत जास्त सोयी-सुविधा व उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सुचविले. या आढावा बैठकीस आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे यांच्याकडून बार्शी ग्रामीण भाग व शहराची कोरोना बाधीत रुग्णांची संख्या त्यांवर सुरू असलेले उपचार, डेडिकेटेड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर मधील रुग्णांकरिता देण्यात येणारी सेवा, उपाययोजना, औषधोपचार या सर्वांची माहिती घेऊन ग्रामीण भागातील कोरोणा संख्या कमी करण्यासाठी मास्टर प्लॅन आखला असून त्या प्रमाणे खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी आढावा बैठकीत सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी शेखर सावंत यांना ग्रामीण भागात गाव पातळीवर प्रत्येक कुटुंबाची खबरदारी घेताना टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्याचा ही सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात होम आयसोलेशन, कोविड केअर सेंटर व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आली. गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, सरपंच ग्रामपंचायत सदस्य आदिंनी मिळून गावची काळजी कशा प्रकारे घ्यावी याबाबतही सूचना आमदार राऊत यांनी दिल्या.
बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेडची कमतरता भासत आहे. या बेडची संख्या वाढविण्याकरता सतत प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी यांच्याशी सतत संपर्कात आहे. नवीन ऑक्सिजन बेडच्या हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात 50 ऑक्सिजन बेडची उपलब्धता असलेले नविन हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बार्शी शहरातील हॉस्पिटलमध्ये बार्शी शहर व ग्रामीण भाग, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब वाशी, माढा, कुर्डूवाडी ईत्यादी ठिकाणच्या ही रुग्णांची उपचारासाठी बार्शीत दाखल होत असलेली वाढती संख्या पाहता बेडची कमतरता भासत असल्याचे कारण त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, शहरातील कर्मवीर डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलला व्यक्तीश: स्वतः, बाजार समिती व मित्र परिवाराच्या मदतीने 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. जेणेकरून या निधीच्या मदतीने या ठिकाणीही ऑक्सिजन बेडची संख्या लवकरच वाढवण्यात येईल व रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता न भासता उपचार देण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे रुग्णांचा वाढता मृत्यू दर आटोक्यात आणण्यासाठी याची मदत होईल. त्याचप्रमाणे कोरोनाच्या संकटात बार्शी शहरातील खाजगी रुग्णालयांनी आपला सहभाग व सेवा चांगल्या प्रकारे दिली असल्याचा उल्लेख आवर्जून केला.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे, बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. अमोल ननवरे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल बोपलकर, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश मांजरे, समाधान डोईफोडे, राजाभाऊ धोत्रे, पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.









