तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
लऊळ ता.माढा येथील मयत राजाराम घुगे याचा लऊळ येथील विवाहित महिलेशी असलेल्या अनैतिकसंबंधातून धारदार हत्याराने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अटकेत असलेल्या वृद्धास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा जामीन मंजूर करण्यात आला. ही सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांच्यासमोर झाली.
याबाबत माहिती अशी की, लऊळ ता.माढा येथे ६ मार्च २०२० रोजी विवाहीत महिलेच्या प्रेमसंबंधावरून घुगे याचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी पती संतोष गोरे व सासरा खंडू गोरे यांच्याविरोधात कुर्डुवाडी पोलिसांत दि.७ मार्च रोजी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी खंडू गोरे याने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा व सत्रन्यायालयाचे कामही व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारा चालू असल्यामुळे सदर जामीनाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांच्यासमोर झाली.
यावेळी खंडू गोरे याला कॅन्सरग्रस्त असून सदर गुन्ह्याचा तपासही पूर्ण झाला असल्यामुळे त्याची जामीनावर मुक्तता करावी असा युक्तीवाद आरोपीचे वकील अॅड. हरिश्चंद्र कांबळे यांनी केल्यानंतर खंडू गोरे यास ४५ हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी सरकारी पक्षातर्फे प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.









