प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कोरोना रुग्णांची तपासणी करणाऱ्या ‘खासगी लॅब’बाबत खोट्या तक्रारी व समाजमाध्यमावर खोटा प्रसार होताना दिसत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. मात्र यातच कोरोना रिपोर्टवरुन अनेक खासगी लॅब’बाबत तक्रारी ही झाल्या. या खोट्या तक्रारी व समाजमाध्यमावर खोटा प्रसार केल्याच्या निषेधार्थ कुर्डुवाडी शहरातील ‘खासगी लॅब’नी कोरोना चाचणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
सध्या कुर्डुवाडी शहरात समाजमाध्यमावर शहरातील काही लॅब बाबत अवास्तव व खोटा प्रसार संदेश फिरत आहे. पोलिसांनी येथील श्री समर्थ लॅब, मुस्कान लॅब व शुभम लॅबला अचानक भेटी देऊन याबाबतची पाहणी केली असता लॅब चालकांकडे सर्व तपासणीच्या अधिकृत प्रमाणपत्रे व किट असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार व माध्यमांवर फिरणाऱ्या संदेशांमुळे लॅब धारकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे येथून पुढे तक्रारदार व अफवा पसरवणार जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी न करण्याचा निर्णय लॅबधारकांनी घेतला आहे. तक्रादाराने व अफवा पसरवणाऱ्याने जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा पवित्रा या लॅबधारकांनी घेतला आहे.
वास्तविक पहाता गेल्या वर्षभराच्या कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून हे लॅबमधील कर्मचारी कोरोना चाचणी करीत आहेत. यासाठी ते स्वतः सर्व दक्षता घेत होते. कोरोना पेशंटचे स्वॅब घेऊन अधिकृत आय सी एम आर नोंदणीकृत लॅबला पाठवून त्यांचे रिपोर्ट ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या अधिकृत पोर्टल व अॅपवरुन डाऊनलोड करुन त्याची काॅपी रूग्णांना देतात. तर रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट मध्ये थायरोकेअरच्या डी आर टी या अॅपमधील सर्व फाॅर्म भरून तसेच कंपनीने दिलेल्या किटचा वापर करण्यापूर्वी व केल्यानंतरचे फोटो सदर अॅपमध्ये लोड केले जातात. तसेच त्यांचे सर्व रिपोर्टही त्याच अॅपमधून डाऊनलोड केले जातात. याची प्रत संबंधिताला व दररोज दिवसभराचा अहवाल नगरपालिकेला अॅपद्वारे दिला जातो. २० तारखेला पोलिसांनी अचानक दिलेल्या भेटीत लॅबमध्ये बोगस काहीही सापडले नाही. तसा जवाब आणि अधिकृत कागदपत्रे लॅबधारकांनी पोलिसांना दिले आहेत. लॅबधारकांना झालेल्या त्रासामुळे लॅबधारकांनी स्वॅब घेणे बंद केले आहे. याचा फटका संभाव्य रूग्णांना होणार असून यामुळे पुढील उपचाराला देखील वेळ लागू शकतो.
सदरच्या तीनही लॅबला तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार अचानक भेट देऊन त्यांच्याकडील कागदपत्रे व किटची तपासणी केली व कागदपत्रे ताब्यात घेतली. ही कागदपत्रे जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवून याबाबतचा त्यांच्याकडून अभिप्राय आल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल. – चिमणाजी केंद्रे, सहा.पो.निरीक्षक
Previous Article‘डान्स दिवाने 3’ शोचा होस्ट राघव जुयाल कोरोना पॉझिटिव्ह
Next Article विद्यापीठ परीक्षा ऑनलाईन









