सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांचे कोविड दरम्यानच्या चार महिन्याचे 200 युनिट, महिना पर्यंत विज बिल माफी, वाढीव वीज दर मागे घेणे व शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०% कमी करा व अधिवेशनात निर्णय घ्या अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने आज रविवारी आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आले.
कोविड-१९ महामारी दरम्यान राज्यातील जनतेची परिस्थिती फारच बिकट होती आणि आजपर्यंत यामधून बाहेर पडलेले नाहीत. असे असतांना या दरम्यानचे म्हणजे दि.1 एप्रिल २०२० पासून वीजदर वाढ करून जास्तीचे वीज देयके देण्यात आलीत, ती रद्द करून २०० युनिट/महिना वीजबिल माफ करावे आणि शिवसेनेकडून जनतेला दिलेले वचन पाळावे याबाबत राज्यात अनेक आंदोलन करून निवेदन दिलेले आहेत. वेळोवेळी मंत्रिमंडळात चर्चाही झाली, आजपर्यंत सरकारकडून याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील जनता निर्णयाची वाट पाहत आहे. आगामी दि.१४-१५ डिसेंबर २०२० ला होऊ घातलेल्या विधानसभा अधिवेशनात जनतेच हित आणि महामारीची परिस्थिती नजरेसमोर ठेवून खालील निर्णय घ्यावेत ही जनतेची आणि आम आदमी पार्टीचे निवेदन आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आले.
हे निवेदन देण्यासाठी आप सोलापुर शहराध्यक्ष मो. अस्लम शेख, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, माशाक कारभारी, नासिर मंगलगिरी, नरसिंग म्हेत्रे, इलियास शेख, अय्युब फुलमामडी, निहाल किरनळ्ळी, असद खतीब आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
१. कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट/महिना वीजबिल माफी करावी.
२. MSEB कडून दि.१ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी.
३. शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे वचनपूर्ती करावी.
४. राज्य सरकार चा 16% अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा.
५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे.









