प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कोयंडा तोडून टीव्ही, दागिन्यासह ६५ हजार रुपयांच्या ऐवज लंपास केला. ही घटना (दि. ४ ) च्या सकाळी १० ते (दि. ६ ) च्या सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान राऊत वस्ती येथे घडली. रेखा भीमराव कदम रा. अयोध्या टॉवर, राऊत वस्ती, बाह्यवळण रस्ता, कुर्डुवाडी यांनी कुर्डुवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी दि. ४ रोजी सकाळी १० वाजता घराचा दरवाजा बंद करुन मोहोळ येथे माहेरी गेल्या होत्या. दि. ६ रोजी सकाळी घरी आल्या असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील दीड तोळ्याच्या २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, ७ हजार ५०० रुपयांचा सोन्याचा कानातील वेल, दीड तोळ्याचा २२ हजार रुपयांचा नेकलेस, २ ग्रॅमची ३ हजार रुपयांची अंगठी,४ हजार रुपये किमतीचा टिव्ही, २ हजार रुपयांचा चांदीचा करंडा, ४ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या रिंगा असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.









