तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात डॉक्टर पती-पत्नी व एक शिक्षक तथा बँकेच्या संचालकासह तालुक्यात एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले. तालुक्यात आजपर्यंत ५६६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कुर्डुवाडी शहराची कोरोना आकडेवारीबाबत शून्याकडे वाटचाल असताना आज अचानक ३ जण अँटीजेन टेस्टमध्ये बाधित झाले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष अडागळे यांनी सांगितले. यातील बाधित डॉक्टर खासगी दवाखान्यात असून पत्नी पुढील परीक्षेची तयारी करत आहे. दुसरे शिक्षक व बँकेचे संचालक आहेत. याचबरोबर माढा तालुक्यात कुर्डू हद्दीतील छोरीया टाऊनशीप भागात एक, लऊळ येथे १, बेंबळे येथे १, मोडनिंब येथे ५, वरवडे १, कुंभेज येथे २ असे एकूण १४ जण कोरोना बाधित असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सदर बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची हायरिस्क व लोरिस्क अशी नोंद घेतली जात असून बाधित रुग्णांचा राहता परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.









