स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरची कामगिरी, एका महिन्यात दुसऱ्यांदा छापा
तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील सिद्धप्पा जम्मा यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली मन्ना नावाच्या जुगार खेळावर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरच्या पथकाने छापा टाकून २ लाख ३९ हजार १५० रुपयांच्या मुद्देमालासह ९ जणांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता किणीत घडली. किणीतील याच शेतात गेल्या महिन्यात सुद्धा जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली होती.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १ रोजी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोसइ अमित पाटील, स.पो.फौ. राजेश गायकवाड, पो. हे.कॉ. दिलीप राऊत, पो.हे.कॉ हरिदास पांढरे, पो.ना. रवी माने, हे सरकारी वाहनाने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध केसेस करिता पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, किणी ता अक्कलकोट येथे सिद्धप्पा जम्मा यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली काही लोक गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत होती. पोलिसांना पहाताच पाच जुगारी इसम उसातून पळून गेले व उर्वरित ४ जणांना पकडण्यात यश आले. त्यापैकी अनिल फुलचंद बंदपट्टे, सदाशिव सीताराम जेटीथोर हे दोघे रा. अणदूर ता तुळजापूर, अर्जुन सिद्धप्पा जळकोटे रा.हनूर नागनाथ शिवानंद काळे रा. सुलतानपूर ता अक्कलकोट असे जुगार खेळताना सापडून आले. पाच दुचाकी मोटारसायकल, ४ मोबाईल फोन, ८८५० रोख रक्कम असे २ लाख ३९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
यासह पळून गेलेल्यापैकी संजय धनु पवार रा चुंगी, भास्कर काळे यांच्यासह इतर तिघांवर मिळून एकूण ९ जणांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सोलापूर गुन्हे शाखेने केली असून या घटनेतील सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.









