स्मार्ट सिटी सीईओ, महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
उत्तर कसबा परिसरात सहा वर्षाच्या पूर्वा सागर अलकुंटे हिचा डीपीतून विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, ठेकेदार आणि महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर कुटूंबीयांनी पूर्वावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले.
स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे सोलापूरकर त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्यात एका निष्पाप मुलाचा दत्त चौक येथे ट्रक्टरच्या धडकेने जीव गेला होता. शहरात सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. नगरसेवक, नागरिक, सामाजिक संस्थांनी स्मार्ट सीटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.
गुरुवारी प्रभाग 7 मधील उत्तर कसबा महात्मा गांधी रोड येथील सहा वर्षाच्या पूर्वा सागर अलकुंटे हिचा रस्त्याच्या लगत असलेल्या उघडÎा डीपीमधून विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुकल्या पूर्वाच्या काकांनी तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा पूर्वाच्या वडिलांनी घेतला. या घटनेची माहिती मिळताच सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक नागेश भोगडे यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे धाव घेतली.
डीपी बसवत असताना पूर्वाच्या पालकांनी विरोध केला होता. तेथील अधिकाऱयांनी त्यांना धमकावले होते. याप्रकरणी स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी केली. स्मार्ट सीटी योजनेमुळे सोलापूर स्मार्ट होण्याऐवजी भकास होत आहे. निष्पाप जीवांचे जीव स्मार्टसीटी घेत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात तक्रार करून देखील उपाययोजना होत नाही. अधिकाऱयांच्या अशा वागण्यामुळेच पूर्वा या चिमुकलीचा जीव गेला आहे. याला जबाबदार असणारे अधिकारी, ठेकेदार, सीईओ आणि आयुक्त यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली.
दरम्यान, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृत पूर्वाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. शुक्रवारी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोषीवर गुन्हा दाखल व्हावा
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोंतम चौकापर्यंत अनेक ठिकाणी डीपी बसवण्यात आले आहेत. हा रहदारीचा मार्ग असून या भागात शाळा, कॉलेज, दवाखाने आहेत. हे डीपी 5 फूट उंच बसवण्यात यायला पाहिजे होते. तसे न करता जमिनी लगत डीपी बसवले आहेत. यामुळेच सहा वर्षाच्या मुलीचा जीव गेला आहे. सीईओ, आयुक्त यांच्यासह जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा.
विनायक विटकर, नगरसेवक









