फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांची दिरंगाई
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/करमाळा
करमाळा तालुक्यात भरदिवसा पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वीट, विहाळ, भोसे या ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. काल, सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या घटनांचा तातङीने तपास हाती घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केली.
घरफोडी झालेले तक्रार देण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांना फिर्याद देण्यासाठी आज बोलवण्यात आले आहे. तर घरफोडीचा तपास तात्काळ व्हावा, अशी मागणी संतोष दिनकर ढेरे यांनी केली आहे.
वीट येथील भैरवनाथनगरमधील प्रकाश ढेरे व संतोष दिनकर ढेरे या दोन्ही भावाची घरे फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. विहाळ येथील बाळासाहेब काशीनाथ बंडगर यांचे गावातील घर दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कुलूप तोडून घरातील चोरी करत असताना शेजारील एका महिलेने पाहिले. यावेळी या महिलेने संबंधितांना विचारले असता आम्ही पाहुणे आहोत, असे म्हणून त्यांनी पळ काढला. तर भोसे येथील सुरवसे वस्तीवरील बापू यशवंत सुरवसे यांच्या घराचे कुलूप व दारवाजा तोडून 15 हजार रुपये व पाच ग्रॅम सोने व चांदीचे दागिने लंपास केले. या गावातील सुदाम यादव सुरवसे यांच्या घराचे कुलूप व दार तोडले, कपाट फोडले आहे. तालुक्यात भर दिवसा घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ तपास करावा अशी मागणी होत आहे.









