तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात २३ जून २०२० पासून सिझेरियन शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला होता. या विभागासाठी कार्यरत असलेले स्त्रीरोग तज्ञ, भूलरोग तज्ञ यांच्या मानधनाची समस्या उद्भवू नये म्हणून मा. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून आ. शिंदे यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील सिझेरियनचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करून घेतला होता. तालुक्यातील गोरगरीब जनतेला याचा फायदा होऊन आजपर्यंत जवळपास १६२ स्त्रियांचे मोफत सिझेरियन करमाळा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
मध्यंतरी डॉक्टरांच्या वैयक्तिक समस्येमुळे भूलरोग तज्ञ यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात येता आले नाही. त्यामुळे दहा दिवस हा विभाग बंद ठेवण्यात आला होता. परंतु ही समस्या आता सुटलेली असून नव्याने भूलरोग तज्ञाची नेमणूक करून हा विभाग पुन्हा कार्यरत झालेला आहे. तरी या मोफत सुविधेचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन आ. संजय शिंदे यांनी केले आहे.









