वार्ताहर / बेंबळे
पुणे जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यापासून होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे धरण साखळीतील १९ धरणांपैकी कळमोडी व खडकवासला ही धरणे भरली आहेत. तर कासारसाई भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. या तीनही धरणातून अनुक्रमे ८६०, १२००, ५१३६ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने बंडगार्डन येथून २१ हजार २७७ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर दौंडमधून १५ हजार ५८५ क्युसेकची आवक उजनी धरणात येत आहे. यामुळे सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील बागायती शेतीसाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. सध्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा ३२.२९ टक्के झाला आहे.
धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी आता उर्वरीत दीड महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. धरणसाठ्यातील पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे लॉकडाऊननंतर कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
यावर्षी सुरूवातीला पुणे परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी उजनी धरणालगतच्या भागात पाऊस झाल्याने उजनी धरण जुलै महिन्याच्या अखेरीस मृत पाणीसाठा ओलांडून उपयुक्त पाणीसाठा होण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. मागील आठवड्यापासून पुणे परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. धरणामध्ये शुक्रवार (दि. १४) ८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यातील १७.३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढून ४९३.२६५ मीटर इतकी झाली आहे.
अद्यापही धरणात पाण्याची आवक होत असून दौंड येथून १५ हजार ५८५ क्युसेक तर बंडगार्डन येथून २१ हजार २७७ क्युसेक पाणी धरणात येत आहे. चांगला पाऊस आणि वाढता पाणीसाठा होत असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पाण्याची शाश्वती वाटू लागल्याने शेतकऱ्यांनी दीर्घकालीन पिकांच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
दि. १४/०८/२०२० उजनी धरणातील पाणीपातळी स. ८ वा.
एकूण पाणीपातळी – ४९३.२६५ मीटर
एकुण पाणीसाठा – ८०.९५ टी.एम.सी
उपयुक्त साठा – १७.३२ टी.एम.सी.
टक्केवारी – ३२.२९ टक्के
आवक
दौंड – १5,५८५ क्युसेक
बंडगार्डन – २१,२७७ क्युसेक
विसर्ग
वीरमधून निरेत विसर्ग – ३२,२१४ क्युसेक
नरसिंगपूर (संगम) विसर्ग – ५३९ क्युसेक
Previous Articleखुशखबर : भारतीय ‘कोवॅक्सिन’ लस पाहिल्या टप्प्यात यशस्वी
Next Article सांगली : वि. रा. जोगळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.